खरं खुरं प्रेम

आज सर्वानी ठरवलं की संध्याकळी चार वाजता साई मंदिरात भेटायचे कारण उद्या सर्वजण लातूर सोडून जाणार होते.मला तिला काहीतरी गिफ्ट द्याव वाटले पण काय देऊ कळत नव्हतं.मी कॉलेज मधुन होस्टेल वर आलो आणि पाकीट उघडून पहिले तर फक्त तीस रुपये…यार आता काय करू ? आकाश कडे मगावेत का ? की यातच काहीतरी चांगलं घ्यावे ? त्या दहा रुपयाच्या तीन नोटा माझ्याकडे पाहून माझी खिल्ली उडवत होत्या.माझे रिकामी पाकीट तर तोंड उघडुन दात दाखवित होतं..काहीच कळत नव्हतं काहीही करून चार वाजण्याचा आत एखादं गिफ्ट घ्यायचे होतं.
    टेबलावर असलेल्या घड्याळात तीन वाजले होते. बाजूलाच लोकसत्ता पेपरवर जॉन अब्राहम चा फोटो पहिला आणि Shootout at Wadala या सिनेमातला एक शेवटचा सीन आठवला..मन्या सुर्वेला मारण्यासाठी पोलीस पुस्तकांतून बंदुकी लपवुन कॉलेज मधे जातात…

ताडकन उठलो आणि गेलो वरच्या रूममधे समर्थकडे आणि सायकलची किल्ली मागितली..सुसाट फोटो स्टुडिओ मधे गेलो आणि विचारल मोबाइल मधे एक फोटो आहे प्रिंट करून मिळेल का ?
त्यांनी हो म्हणताच मी विचारले किती होतील. वीस होतील बघ ;देऊ का ? अस ते काका म्हणाले..तेव्हा आपल्या calculation प्रमाणे घडतंय पाहून हायसे वाटले.त्यांना सांगितले प्रिंट करून ठेवा मी आलो.सायकल फिरवली आणि थेट स्टेशनरी मधे जाऊन पाच रूपयाचा फेवीकोल आणि पाच रूपयाचा कटर घेतला..अर्धा तास तिथेच गेला.फोटो घेऊन लागलीच होस्टेल वर गेलो.
      माझ्याकडे असलेल्या डायरीचे मी पेजेस आयताकार कापून डायरी मधे स्पेस तयार केली ते करत असताना माझ्या रूममधे नयन कसबे आला होता.मला डायरी फाडताना पाहून बोलला की सम्या काहून एवढी चांगली डायरी खराब करतोय ? मी त्याला म्हटलं just wait and watch..boss..तो म्हटला, बर वॉचतो..

त्या स्पेस मधे मी जो फोटो प्रिंट करून आणला होता तो चिपकवला..
मायला सम्या हा कोणाचा फोटो बे.? मी त्याला म्हटलं, भावा नंतर संगतो मला उशीर होतोय. मी असाच धावत गेलो यावेळी सायकल नाही घेतली. ती आणि सगळेजण आधीच मंदिरात पोहचले होते. तिला गुलाबी ड्रेस मधे हसताना पहिलं आणि माझं काळीजच विरघळलं.

ती ,प्रिया ,अमोल,सुरेखा ,सुदर्शन ,क्रुष्णा,पीयूषा,श्रावणी,मयुरी ,शितल आणि मी सर्वजण जमलो.मला अशी खबर मिळाली होती की सर्व मुली आम्हाला पार्टी देणार आहेत.दर्शन घेतल आणि मुख्य रस्त्याकडे जाऊ लागलो.मी सोडून सर्वानी माने सरांना पहिलं कारण मी दुसरीकडेच पहात होतो आता कुठे ते सांगायला हवय का?

तिथून रिक्षा पकडली आणि सर्वजण हॉटेल Cruise वर गेलो. जेवणासाठी ऑर्डर केली.मी मात्र विचार करत होतो हिला गिफ्ट आता द्यावे की नंतर मग म्हटलं जेवण झाल्यावरच देऊ. जेवताना आमच्या मधे थोडं खोडकर भांडण झाले. जेवण झालं आणि जाताना तिला ती डायरी दिली; क्षणार्धात तिच्या डोळ्यात अश्रूना पापण्यानसोबत खेळताना पहिलं.तिला रडताना पाहून प्रियाने तिच्याकडून डायरी ओढून घेतली आणि तिने विचारले हिच्या आई बाबांचा फोटो कुठे सापडला ? स्मित हास्य आणून फ़ेसबुक वरून मिळवल्याचे स्पष्ट केले.
माहीत नाही पहिल्यांदा तिचे अश्रू पाहून मला आनंद होत होता……
मला माहितेय तु उद्या इथून निघून जाणार….
ह्रुदयात नाही पण किमान तुझ्या आठवणीत मी नक्की राहणार..

Comments